कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या 7 ठिकाणी छापे

Foto
चेन्नई : कोल्ड्रिफ कफ सिरपने अनेक लहान मुलांचा जीव घेतला आहे. या प्रकरणासंदर्भात ईडीने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. चेन्नईतील श्रीसन फार्माच्या सात ठिकाणी छापे टाकले. श्रीसन फार्माच्या कार्यालयांवर तसेच तामिळनाडू औषध नियंत्रण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.

ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफमुळे किमान 23 मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यापैकी बहुतेक मुले पाच वर्षांखालील होती. श्रीसन फार्मास्युटिकल्सचे मालक जी. रंगनाथनला मध्य प्रदेश पोलिसांनी 9 ऑक्टोबर रोजी अटक केली.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने दिलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये तमिळनाडू अन्न आणि औषध प्रशासन (टीएनएफडीए) द्वारे परवाना मिळालेल्या कांचीपुरम येथे असलेल्या श्रीसन फार्माने खराब पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय औषध सुरक्षा नियमांचे अनेक उल्लंघन असूनही दशकाहून अधिक काळ काम सुरू ठेवलं. या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाच्या अत्यंत विषारी पदार्थाचं धोकादायक प्रमाण आढळून आले.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्‍न आता पालक विचारत आहेत. एम्स दिल्ली येथील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. पंकज हरी यांनी या गंभीर मुद्द्यावर महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, जर कफ सिरपमध्ये भेसळ नसेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलं गेलं तर त्यामुळे नुकसान होत नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांना सिरप देणे अत्यंत धोकादायक असू शकते.